Menu

संगीत दीपोत्सव २०१९

दिनांक १९/१०/२०१९ रोजी व्यास संगीत विद्यालय, दादर येथे दिवाळीनिमित्त ‘संगीत दीपोत्सव’ हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला. सायंकाळी ५ ते ८ या वेळात ही सांगितीक मैफल येथे सजली होती.

दिवाळीनिमित्त होणाऱ्या या कार्यक्रमास विद्यार्थ्यांचा नेहमीच उदंड प्रतिसाद लाभतो, तसा तो यावेळी सुद्धा दिसून आला. आपापल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी मोठ्या तयारीने गाणी सादर केली. या आणि क्लासमध्ये सादर होणाऱ्या सगळ्याच कार्यक्रमांमधली विशेष गोष्ट म्हणजे तबला आणि पेटीवर साथसंगत करायला आपल्याच क्लासचे विद्यार्थी असतात, त्यात अनेकांच्या गायन तसेच वादन कलागुणांना वाव मिळतो, त्यामुळे हे कार्यक्रम विद्यार्थीप्रिय आहेत.

दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरवात झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी अतिशय उत्तमोत्तम गाणी सादर केली. विषयाचे बंधन नसल्याने मराठी भावगीते, नाट्यगीते, भक्तिगीते, लोकगीते, चित्रपटगीते तसेच हिंदी गाणी असा वैविध्यपूर्ण संगीतनजराणा विद्यार्थ्यांनी पेश केला. श्रोते सुद्धा या सुखद स्वरशिंपणीने न्हाऊन निघाले. त्यांची शेवटापर्यंत असलेली उपस्थिती ही जणू कार्यक्रम यशस्वी झाल्याची पोचपावतीच होती. विस्तारभयामुळे सगळ्या गाण्यांचा उल्लेख करणं शक्य नाही, पण तरीही मोगरा फुलला, गुरु परमात्मा परेशु ही भक्तीगीते, छबीदार छबी, दिसला गं बाई दिसला या लावण्या, तोच चंद्रमा नभात, दिवस तुझे हे फुलायचे ही भावगीते, हिंदी गाण्यांमध्ये लागा चुनरी में दाग, चेहरा है या चांद खिला है आणि लोकगीतांमध्ये खंडेरायाच्या लग्नाला ही आणि आणखी काही गाणी विशेष लक्षवेधी ठरली.

कार्यक्रमात साथसंगत करायला हार्मोनियमवर स्वतः श्री. विलास कुंदेकरसर तर तबला, ढोलकी आणि साईड रिधमवर आपल्याच क्लासचे कलानिपुण, अनुभवी आणि उत्साही विद्यार्थी सहभागी झाले होते. उत्कृष्ट ध्वनीसंयोजनामुळे कार्यक्रम श्रवणीय होण्यास हातभार लागला, याची जबाबदारी सुद्धा आपल्याच क्लासच्या गुणी विद्यार्थ्यांकडे होती, आणि त्यांनी ती उत्तमपणे निभावली.

कार्यक्रम नियोजनबद्ध करण्याची, कुठेही तो ढिसाळ होणार नाही याची, तसेच वेळेत सुरु करून वेळेत संपवण्याची म्हणजेच सूत्रसंचालनाचीी जबाबदारी कु. दर्शना गडमुळे यांनी समर्थपणे पेलली.

कार्यक्रमात उपस्थितांना रुचकर अल्पोपहार देण्यात आला. त्यासाठी विद्यार्थ्यांनीच स्वयंस्फूर्तीने ऐच्छिक वर्गणी जमा केली.

सजावटीचे काम आपले विद्यार्थी नेहमीच मोठ्या हौसेने करतात. यावेळी दिवाळीचे स्वागत करण्यासाठी क्सासच्या विद्यार्थीनी श्रीमती आशा कनवजे यांनी अतिशय मोहक आणि सुंदर अशी रांगोळी मोठ्या नजाकतीने काढली, शेजारी पणती तेवत ठेवल्यामुळे रांगोळी खूपच मंगलमय भासत होती.

श्री.विलास सरांनी ‘नमस्तुते शारदा माते’ हे शारदास्तवन अतिशय रसाळपणे गाऊन उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या कार्यक्रमाची सांगता केली.

या कार्यक्रमास पं.श्री.विद्याधर व्यास सर, श्री.सुभाष व्यास सर व समस्त शिक्षकवृंदाचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मोलाचे सहकार्य लाभले.

Dear Students,

          Please be informed that on-premise classes at The Vyas Academy Of Indian Music are held every evening from Monday to Saturday. Classes for Vocal, Sitar, Tabla, Harmonium, Violin, Guitar and Keyboard are conducted.

For further information, kindly contact :

Shri Prabhakar Kulkarni on 9930741488.(10:00 am to 9:00 pm)

Vyas Sangeet Vidyalaya on 9136092358.(10.00 am to 8.00 pm)

Okay