दिनांक ०२/०२/२०२० रोजी व्यास संगीत विद्यालयातर्फे ‘विद्यार्थी संगीत संमेलन’ हा कार्यक्रम ‘वनमाळी सभागृह’, दादर येथे आयोजित करण्यात आला.
विद्यालयाच्या दादर येथील वास्तूमध्ये विद्यार्थ्यांच्या सांगितीक कलागुणांना वाव देण्यासाठी त्रैमासिक कार्यक्रम आयोजित केले जातात. त्याला नेहमीच उत्तम प्रतिसाद मिळतो. परंतु कार्यक्रम सादरीकरणासाठी हाताशी असणारा कमी वेळ बघता बऱ्याचदा काही विद्यार्थ्यांना कार्यक्रमात सहभागी होता येत नाही, त्याचप्रमाणे या जागेत श्रोत्यांना बसण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध होत नाही. या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्यानंतर अशा, क्लासच्या जागेत पार पडणाऱ्या छोटेखानी कार्यक्रमास भव्य स्वरूप देण्याची कल्पना पुढे आली. ही कल्पना व्यासप्रभुतींसमोर मांडल्यावर त्यांनी तत्परतेने त्यास रुकार दिला. पं. विद्याधर व श्री सुभाष व्यास सरांनी सर्वतोपरी मदत व प्रोत्साहन दिले आणि ‘विद्यार्थी संगीत संमेलन २०२०’ हा भव्य सांगितीक कार्यक्रम अतिशय यशस्वीरित्या पार पडला.
क्लासतर्फे दादर येथील वनमाळी सभागृह दिवसभराच्या कार्यक्रमासाठी उपलब्ध करून देण्यात आले. येथे विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या गायन वादनाच्या एकापेक्षा एक सरस कार्यक्रमांची रेलचेल तर होतीच परंतु मोठ्या संख्येने उपस्थित श्रोतृवर्गास बसण्यासाठी या सभागृहात मोकळी आणि वातानुकूलित जागा असल्यामुळे अशा अल्हाददायक वातावरण रसिकांना या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटता आला.
प्रथेप्रमाणे पं विद्याधर व श्री सुभाष व्यास आणि श्री प्रभाकर कुलकर्णी सर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात झाली.
त्यानंतर सौ स्वराली मॅडम यांच्या विद्यार्थिनींनी पं विष्णू दिगंबर पलुस्कररचित ‘जय जगदीश हरे’ ही प्रार्थना म्हटली. विशेष लक्षवेधी गोष्ट म्हणजे या सादरीकरणात साथीला तबला, पेटी आणि सतारीवर क्लासमधील समस्त ज्येष्ठ शिक्षकवृंद आणि श्री सुभाष व्यास सर मंचावरवर स्वतः हजर होते.
२०१९ मधे पं विद्याधर व्यास यांना मध्य प्रदेश शासनातर्फे अत्यंत मानाचा असा ‘तानसेन पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. हे औचित्य साधून व्यास संगीत विद्यालयाचे शिक्षक व विद्यार्थी यांच्यातर्फे सौ स्वराली मॅडम यांनी पंडीतजींना शाल व श्रीफळ देऊन सन्मानित केले.
या आणि अशा अभिनव कार्यक्रमांसाठी सदैव प्रोत्साहन देणाऱे श्री सुभाष व्यास सर आणि क्लासचे दैनंदिन व्यवहार, प्रवेश, फी, परीक्षा असे महत्वपूर्ण काम अतिशय चोखपणे पार पाडणारे श्री प्रभाकर कुलकर्णी, या क्लासच्या दोन भक्कम आधारस्तंभांचाही यथोचित सन्मान अनुक्रमे श्री गोविंद काळसेकर आणि श्री विलास कुंदेकर यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी श्री सुभाष व्यास सरांनी, हा सांगितीक कार्यक्रम विद्यार्थ्यांचा असून तो विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांकरिता सादर करायचा आहे असे मोठे मार्मिक विवेचन केले, त्याचसोबत त्यांनी पं विद्याधर व्यास यांचा अल्पपरिचय सुद्धा करून दिला.
पंडित व्यास यांनी आपल्या मनोगतात संगीत शिक्षणाची परंपरा, गांधर्व महाविद्यालय तसेच व्यास संगीत विद्यालयाचा इतिहास विषद केला. तानसेन तर असलेच पाहीजेत परंतु त्यांच्या कलेला दाद देणाऱ्या, संगीताचा, कान आणि जाण असलेल्या उत्तम आणि गुणग्राही कानसेनांची म्हणजे श्रोत्यांचीही तितकीच गरज असते हे ठळकपणे नमूद केले.
मुख्य कार्यक्रमात गायन, तबला, हार्मोनियम, व्हायोलिन आणि सतार या विभागातील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपापली कला सादर केली. त्यात खूप वैविध्य होते आणि त्यामुळे श्रोत्यांसाठी सुद्धा ही एक सांगितीक मेजवानी होती.
गायन विभागात पुरुष गायकांनी राग भीमपलासी व काफी रागावर आधारित बंदिशी आलाप आणि तानांसकट गाऊन दाखवल्या. तर संख्येने जास्त असलेल्या स्त्रीयांनी भूपाळी, काफी, देस, बिहाग आणि केदार राग सादर केले. एक अभिनव गोष्ट म्हणजे प्रत्येक राग आळवल्यानंतर या गायनवृंदाने त्या त्या रागांवर आधारित हिंदी मराठी गाणी म्हटली. त्यामुळे श्रोते त्या रागाशी पटकन जोडले जात होते. प्रत्येक सादरीकरणाला उत्स्फूर्त टाळ्या पडत होत्या. या गायनप्रकारात विशेष लक्ष वेधून घेतले ते ‘देस’ राग गाणाऱ्या चमूने. सौ. स्वराली मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी गायलेल्या ‘मन मंदिरा तेजाने’ या गाण्यात अतिशय उत्कृष्टपणे सादर केलेले द्रुतगतीतले सरगम बोल रसिकांची मने जिंकून गेले.
तबला विभागात आज छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत समस्त विद्यार्थ्यांनी मोठी बहार आणली. श्री अरूण कुंदेकर व श्री गोविंद काळसेकर यांचे बेताच्या उंचीचे, गोंडस चेहऱ्याचे हे छोटे छोटे तबलावादक विद्यार्थी आपल्या इवल्याशा हातानी तबल्यावर जी काही आत्मविश्वासपूर्ण आणि दमदार थाप देत होते ते पाहून खरच अचंबित व्हायला होत होते. तबला वादनात आज त्रिताल आसमंतात भरून राहीला होता. कायदा, तुकडा, तिहाई असे वैविध्यपूर्ण वादन रसिकांना हाता पायाचा ठेका धरायला लावत होते. सोबत हार्मोनियमवर विशिष्ट लयीत वाजणारा लेहरा या संगीतमेळाला एका वेगळ्याच उंचीवर नेत होता.
एकाच मंचावर तीन तबला विशारद अवतरल्यानंतर आता काहीतरी विशेष ऐकायला मिळणार म्हणून श्रोते सरसावून बसले. डाॅ. सुबोध, सुनिल आणि कैवल्य या नाणावलेल्या अनुभवी कलाकारांनी त्यांची कामगिरी चोख बजावली. त्यांचे दमदार वादन, बोल म्हणण्याची पद्धत, सराईतपणे समेवर येणे या सगळ्यातली सफाई बघून ऐकून श्रोते मंत्रमुग्ध झाले. तबलावादकांच्या भावमुद्रा टिपणे ही सुद्धा एक सुंदर अनुभूती होती.
प्रतींदी पुरोहीत या विद्यार्थीनीचे तबलावादन सुद्धा विशेष लक्षवेधी ठरले.
हार्मोनियम विभागात श्री विलास कुंदेकर सरांच्या मार्गदर्शनाखाली हार्मोनियम वादनाचे उल्लेखनीय सादरीकरण करणाऱ्या श्रेया यादव आणि तेजश्री ठीक यांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. त्यांचे जराही कुठे मागे पुढे न होता समकालिक आणि अतिशय सुनियोजित वादनकौशल्य पाहून /ऐकून कौतुकमिश्रीत आश्चर्य वाटले. चुकीला जरा सुद्धा वाव न ठेवलेली त्यांची बोटे मोठ्या आत्मविश्वासाने आणि सराईतपणे हार्मोनियमवर फिरत होती. मालकंस रागावर आधारित ‘कोयलीया बोले’ ही बंदिश त्यातल्या ताना आणि आलापांसकट वाजल्यानंतर त्यांनी ‘ कानडा राजा पंढरीचा’ हा मालकंस रागावर आधारित अभंग वाजवून श्रोत्यांची मने जिंकली.
सिद्धेश पोफळे हा हार्मोनियम विभागातला गुणी विद्यार्थी आहे. अतिशय शांत चित्ताने कसलीही घाई, गडबड, गोंधळ न करता पूर्णपणे तल्लीन होऊन हार्मोनियम वादन कसे करावे याचा उत्तम वस्तुपाठ म्हणजे सिद्धेशचे हार्मोनियम वादन. अनवट अशा राग ‘शंकरा’ वर आधारित ‘मुरली बजाई सुंदर प्यारे’ ही बंदिश, रागविस्तार आणि तराण्यांसोबत सादर केल्यावर त्याच रागावर आधारित थोडे अवघड असे ‘गुरु परमात्मा परेषु’ हे गाणे त्याने बारकाव्यांसकट लिलया वाजवले.
व्हायोलिन विभागात सुद्धा विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या संचांनी तिलक कामोद, पटदीप, भीमपलासी राग आळवले. व्हायोलिन हे वाद्य वाजवायला तसे कठीण असते. तरीही या विद्यार्थ्यांची मेहनत आणि अचूक संयोजन यामुळे व्हायोलिन वादन संस्मरणीय ठरले. पटदीप रागावर आधारित ‘मर्मबंधातली ठेव ही’ हे नाट्यगीत या मुलांनी सुंदर पद्धतीने वाजवले. उपस्थित प्रेक्षक व्हायोलिनच्या सुरात सूर मिसळून चक्क गात होते.
काही अपरिहार्य कारणांमुळे व्हायोलिन विभागाचे शिक्षक सौ.शलाका देशपांडे मॕडम् कार्यक्रमास उपस्थित राहू शकल्या नाहीत, त्यामुळे या विभागातल्या सगळ्या कार्यक्रमांच्या सादरीकरणाची जबाबदारी विद्यार्थ्यांनी उमजून स्वतःच उचलली. रसिक धवन या विद्यार्थ्याने विशेष पुढाकार घेऊन जवळपास पाच वेगवेगळ्या ग्रुपचे कार्यक्रम व्यवस्थित सादर होतील याच्याकडे जातीने लक्ष दिले. या विभागात विशेष संस्मरणीय ठरलेला कार्यक्रम म्हणजे साधारण पंधरा व्हायोलिन वादकांनी दादरा ठेक्यावर एक पाश्चिमात्य धूनचे स्वर व्हायोलिनवर छेडले. अतिशय काटेकोर संगीत संयोजनामुळे ही धून ऐकणे हा स्वर्गीय अनुभव होता.
सतार विभागातील विद्यार्थिनींनी सादर केलेले वादनाचे दोन्ही कार्यक्रम उत्तम जमले होते. भाग्यश्री जाधव यांनी छेडलेला राग खमाज आणि दर्शना गडमुळे व निकिता तांबे यांनी सादर केलेला यमन रागातील विलंबित आणि द्रुत झाला तसेच मिश्र खमाज रागातील एक धून खूपच श्रवणीय होती.
पं विद्याधर व्यास यांचे शिष्य श्री चित्रांशु श्रीवास्तव यांनी खमाज रागावर आधारित ‘वैष्णव जन तो’ हे भजन आणि पंडितजींचेच दुसरे शिष्य श्री धीरज पराशर यांनी शुद्ध सारंग रागातील ‘मानो मानो हमरी बतीया’ ही बंदीश मोठ्या तन्मयतेने सादर केली
तीसपेक्षा जास्त कार्यक्रम असलेले आणि दिवसभर चाललेले हे संगीत संमेलन कुठेही रटाळ होणार नाही, भरकटणार नाही ही मोठ्या जोखमीची जबाबदारी म्हणजेच सूत्रसंचालनाचे अवघड शिवधनुष्य श्रीमती आशा कनवजे आणि सौ भक्ती खंदारे या द्वयीने लिलया पेलले. निवेदनाच्या आपल्या खुमासदार शैलीत, प्रसंगी अनेक दाखले, गोष्टी, कविता यांची पेरणी करत सूत्रसंचालन एकसुरी होऊन न देता त्यात त्यांनी रंगत आणली आणि हा कार्यक्रम वाहता ठेवला.
कार्यक्रमात तबला आणि पेटीवर साथसंगत करायला आपल्या क्लासचेच विद्यार्थी आलटूनपालटून बसत होते.
नुकताच तबला विशारद झालेला आणि आपल्या क्लासचा बहुआयामी विद्यार्थी श्री सुनील भोसले यांनी ध्वनीसंयोजन आणि प्रक्षेपणाची जबाबदारी चोख बजावली. त्याच्या सहकार्याने साऊंड सिस्टीम, माईक्स, स्पीकर इ गोष्टी उपलब्ध झाल्या आणि कार्यक्रम श्रवणीय होण्यास मदत झाली.
उपस्थित शिक्षक, विद्यार्थी आणि श्रोते यांच्यासाठी व्यास संगीत विद्यालयातर्फे सकाळचा चहा नाष्टा, दुपारचे सुग्रास भोजन आणि संध्याकाळी पुन्हा चहा अशी सोय करण्यात आली होती.
कार्यक्रमाचे व्हिडिओ शुटींग आणि क्षणचित्रे टिपण्याची जबाबदारी श्री कमलेश दादरकर यांच्याकडे देण्यात आली.
व्यासपीठाची सजावट, वाद्ये क्लासमधून हाॅलवर आणणे आणि संध्याकाळी पुन्हा नेऊन ठेवणे हे महत्वाचे काम नेहमीप्रमाणे आपल्या विद्यार्थ्यांनी हसतमुखाने पार पाडले.
हाॅलच्या दारात निमंत्रीतांच्या स्वागताप्रीत्यर्थ कलात्मक रांगोळी काढण्याचे काम श्रीमती आशा कनवजे, सौ लक्ष्मी भोवड व गिरीश घैसास यांनी केले
या संगीत संमेलनात रसिक श्रोत्यांची शेवटपर्यंत असलेली उपस्थिती ही हा कार्यक्रम अत्यंत यशस्वी झाल्याची पावतीच होती.
या संमेलनाची आठवण म्हणून, त्यात सहभागी होऊन आपापल्या परीने छोटे मोठे योगदान देणारे समस्त विद्यार्थी आणि शिक्षकवृंद यांचा पं विद्याधर व सुभाष व्यासप्रबुतींसोबत एक ग्रुप फोटो घेतल्यानंतर या कार्यक्रमाची सांगता झाली.
शब्दः श्री.गिरीश घैसास
Dear Students,
Please be informed that on-premise classes at The Vyas Academy Of Indian Music are held every evening from Monday to Saturday. Classes for Vocal, Sitar, Tabla, Harmonium, Violin, Guitar and Keyboard are conducted.
For further information, kindly contact :
Shri Prabhakar Kulkarni on 9930741488.(10:00 am to 9:00 pm)
Vyas Sangeet Vidyalaya on 9136092358.(10.00 am to 8.00 pm)