व्यास संगीत विद्यालय येथे दिनांक १६/०३/२०१९ रोजी शास्त्रीय संगीताचा त्रैमासिक कार्यक्रम संपन्न झाला.
कलानिपुण अशा आपल्या अनेक विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात आपापल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम तयारीने खूप श्रवणीय गायन आणि वादन सादर केले.
माननीय श्री. सुभाष व्यास सर आणि मान्यवर शिक्षकांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात झाली.
गायन विभागात समुह तथा एकल गायन प्रकारात अनेक रागातल्या बंदिशी ऐकायला मिळाल्या.
सौ. स्वराली मॅडम यांच्या उत्तम मार्गदर्शनाखाली क्लासच्या विद्यार्थिनी समिक्षा, गार्गी, चैताली, मेधा, विनम्रा, रुपाली, वैशाली आणि आयुषा यांनी ‘जय जगदीश हरे’ ही प्रार्थना तसेच दुर्गा रागातील ‘मनमोहन मुरलीवाला’ ही बंदीश सादर केली.
समुह गायनाच्या दुसऱ्या संचात आज्ञा, किन्नरी, गणेश, राजस आणि वैष्णवी यांनी भूप रागातील ‘मंगलमय जय वाणी गजानन’ ही पारंपारिक बंदिश तसेच ‘हिच आमुची प्रार्थना’ हे भक्तीगीत मोकळ्या आणि सुरेल आवाजात सादर केले.
गायन विभागात आज उत्तम कामगिऱ्यांची जणू चढाओढच लागली होती. बागेश्री रागातील अतिशय मधुर अशी ‘पायल बाजे मोरी’ ही बंदिश तन्मयतेने पेश केल्यावर लक्ष्मी, भक्ती, मोहिनी, मेधा, रितिका, निधी आणि सुवर्णा या विद्यार्थिनींनी पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली म्हणून ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ हे भावपूर्ण गीत सादर केले. या गीतात सौ. स्वराली सावंत मॅडम यांनी सुद्धा स्वरसंगत करून, हे गीत एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले.
देस रागातील ‘वाजवी हरी मधुर वेणु’ ही मधुर रचना सादर केल्यानंतर, देस रागावर आधारीत ‘किती सांगु मी सांगु कुणाला’ हे अवीट गोडीचे गीत कुंदा, सोनिया, सुनिता, अश्विनी, अलका, दिक्षा आणि सुरेखा यांनी सादर केले. या गाण्यासोबत तबल्याची साथ करणा-या निहार यादव यांच्या दमदार वादन कौशल्याने सगळ्यांचीच मने जिंकली.
त्यानंतर विद्यार्थिनींच्याच आणखी एका संचाने केदार रागातील ‘धन धन धवल शिखर’ ही बंदिश आणि त्यानंतर केदार रागातील तराणा मोठ्या खुबीने आणि तयारीने सादर केला. यात सहभागी होत्या सोनाली, दिपाली, आशा, वंदना, अश्मदा, रुपाली, तन्वी, जान्हवी आणि निकिता.
गायन विभागात पुरुष विद्यार्थी सुद्धा मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. भिमपलासी रागातील बंदिश आणि आलाप रविंद्र, नितीन, गोविंद, लुकमान आणि नितीन यांनी सादर केली तर, ‘आज शाम मोह लियो’ ही खमाज रागावर आधारित बंदिश कामेश्वर, करम सिंघ, हर्ष आणि अनिकेत यांनी सादर केली.यांना तबला संगत केली श्री.विक्रांत यादव यांनी.
हार्मोनियम विभागात श्री. विलास कुंदेकरसर यांच्या विद्यार्थ्यांनी अतिशय सरस कामगिरी केली. समुहवादन प्रकारात श्रेया व तेजस्वी यांनी राग आसावरी तर एकल वादन विभागात अमृताने राग बिहाग सादर केला. श्री लक्ष्मण दळवी यांनी राग यमन पेश केला. हार्मोनियमवर एकाच लयीत हळूवार पण अचूकपणे आणि सहजतेने बोटे फिरवण्याचे या विद्यार्थ्यांचे हे तंत्र विशेष लक्षवेधी ठरले.
तबला वादन विभागात आज छोट्या मुलांनी मोठी बहार आणली. साधारण सात ते दहा वयोगटातील या मुलांना तबल्यावर दमदार थाप देताना बघून श्रोते मंत्रमुग्ध झाले. एकल तबलावादनात विधी, जान्हवी आणि सिद्धांत यांनी त्रिताल सादर केला.
समुह तबलावादनात धृव याने झपताल, तर सुवीर,आणि मयुरेश यांनी त्रिताल सादर केला. श्री.काळसेकर सरांच्या कार्तिक, आदि, स्वराज, आणि शाश्वत या चिमुरड्यांनी तब्बल बारा मिनीटे त्रितालाच्या ठेक्यावर श्रोत्यांना डोलवले.
प्रवेश आणि हर्ष या मुलांनी तबल्यावर पुन्हा एकदा त्रितालाचा ठेका मोठ्या तयारीने धरला आणि उपस्थित श्रोते या छोट्यांचे वादनकौशल्य पाहून अचंबित झाले. शेवटी टाळ्यांचा कडकडाट ही त्याचीच पोचपावती होती.
सतार वादन विभागात दर्शना व वसुंधरा यांनी अनुक्रमे मालकंस – मांड आणि हमीर राग आळवला. सतार हे वाजवण्यास तसे अवघड तंतुवाद्य परंतु सतारीच्या तारांमधून निघणारी मिंड ऐकणे हा एक अविस्मरणीय अनुभव होता. कुलकर्णी सरांना हातात सतार घेऊन त्याच्या तारा जुळवताना बघणे आणि त्यानंतर त्यांनी सहजतेने मालकंसचा राग विस्तार छेडणे ही कानसेनांसाठी विशेष पर्वणी होती.
व्हायोलिन वादन विभागात सौ.शलाका देशपांडे-मोरे मॅडम यांच्या विद्यार्थ्यांनी सुरांच्या बरसातीने वातावरण भारून टाकले.
भक्ती, नुपूर, निष्ठा, सोनाली आणि तन्वी यांनी राग दुर्गा पेश केला तर स्विटी, गार्गी, आशिष, आणि तेजल यांनी थोडा अनवट असा अलैया बिलावल राग व्हायोलिनवर सहजपणे छेडला.
अभिजीत, गौरी, गार्गी आणि आश्लेषा यांनी राग वृंदावनी सारंग सफाईदारपणे सादर केला.
तिलंग रागातल्या सुरांची शिंपण करण्याचे तसे कठीण आव्हान गाविन आणि रसिक या द्वयीने लिलया पेलले. त्यानंतर व्हायोलिनवर त्यांनी ‘पायोजी मैने रामरतन ‘ हे पारंपरिक भजन मोठ्या तन्मयतेने वाजवले. त्यास श्रेयस मोंडकरने तबल्याची अप्रतिम साथ केली.
थोडे आर्त आणि गंभीर असे व्हायोलिनचे स्वरमाधुर्य अनुभवताना त्या वादनाशी डोळे मिटून एकरूप झालेली ही वादक मंडळी बघणे हा सुद्धा एक मनोज्ञ अनुभव होता.
नोव्हेंबर – डिसेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा श्री. सुभाष व्याससरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर माननीय सरांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहनात्मक मार्गदर्शन केले. सरांनी अतिशय ऊर्जात्मक पद्धतीने त्रितालातील पेशकार, कायदा, तुकडा आणि गत याची झलक दाखवून उपस्थित प्रेक्षक – विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले.
उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या कार्यक्रमात कळस चढविला ते आपल्या व्यास संगीत विद्यालयातील पं.मिलिंद रायकरजी यांच्या आवडत्या शिष्या आणि नामांकित कलाकार सौ.शलाका मॕडम यांच्या व्हायोलिन वादनाने. त्यांना तबला संगत श्री.सुनिल भोसले यांनी केली. कानसेनांसाठी ही सुवर्णसंधी होती. विलंबित गतीतून सुरु झालेला राग यमन चढत्या क्रमाने द्रुतगतीत पोहोचला. व्हायोलिनचे स्वर बोट धरून श्रोत्यांना खेळवत होते, त्याला अतिउत्तम अशी तबल्याची साथ होती. तबला ऐकावा की व्हायोलिन अशी रसिकांची द्विधा मनस्थिती झाली. या अजोड लयकारीमुळे अक्षरशः भान हरपले, एका विशिष्ट क्षणी एक दमदार तिय्या घेऊन यमनची सांगता झाली.
‘रचा प्रभु तुने यह ब्रह्मांड’ या भैरवीचा समारोप श्री.मंगेश पेरवी यांच्या तबला साथीसह झाला.
या संपूर्ण कार्यक्रमात कलाकारांना तबल्याची साथ संगत करण्याचे महत्वपूर्ण काम आपल्या क्लासचे कसलेले आणि गुणनिपुण विद्यार्थी कु.प्रातिंदी, ऋत्विक,श्रीधर, सचिन,सुनिल,श्रेयस, किरण, विक्रांत आणि निहार यांनी केले तर हार्मोनियम संगतीची जबाबदारी सिद्धेश तसेच स्वतः स्वराली मॅडम आणि काळसेकर सर यांनी उचलली.
श्रोत्यांना हा कार्यक्रम व्यवस्थित ऐकता यावा म्हणून ध्वनीप्रक्षेपणाची चोख व्यवस्था बघण्याचे काम सुनिल भोसले आणि प्रसाद गावंड व रुपेश धोपटे यांनी केले. तर या मैफिलीचे क्षण कॅमे-यात टिपण्याचे काम फोटोग्राफर श्री कमलेश दादरकर यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजनबद्ध सुत्रसंचालन व निवेदन कु.दर्शना गडमुळे यांनी केले.
सर्व विद्यार्थी तसेच माननीय शिक्षक यांच्या अमूल्य योगदानामुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला.
शब्दांकनः श्री.गिरीश घैसास
Dear Students,
Please be informed that on-premise classes at The Vyas Academy Of Indian Music are held every evening from Monday to Saturday. Classes for Vocal, Sitar, Tabla, Harmonium, Violin, Guitar and Keyboard are conducted.
For further information, kindly contact :
Shri Prabhakar Kulkarni on 9930741488.(10:00 am to 9:00 pm)
Vyas Sangeet Vidyalaya on 9136092358.(10.00 am to 8.00 pm)